अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’

अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍यांच्या, मानसिकतेत आणि त्याच्या विविध प्रणाली (Systems) तसेच, त्यांच्या अत्याधुनिक संसाधनांमध्ये निर्घृण ‘हिंसाचार’ सुप्त स्वरुपात खोलवर दडलेला असतो!

वरकरणी, ते बेमालूम ‘सभ्यता व माणुसकी’चं सोंगढोंग वठवत रहातात जरुर…पण, जाणकाराला त्यांच्या प्रत्येक कृतित, चालीत व हालचालीत ‘हिंसाचारा’ची विकृती, ओंगळवाण्या स्वरुपात ओघळताना दिसत रहाते.

अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर झाल्यावर, तो अन्याय-अत्याचार, ते अनन्वित शोषण सातत्याने सहन करणारा पापभीरु सामान्य माणूसदेखील…राष्ट्रपिता म. गांधी किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं व आपल्या अंतःकरणात जपलेलं ‘अहिंसा’ हे जीवनमूल्य…प्रसंगी बाजुला सारुन अन्याय-अत्याचाराविरुद्ध ‘अन्याया’चा प्रतिशोध म्हणून हिंसाचाराचा आश्रय घेताना दिसतो…भले, त्यातून पुढे न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नसली किंवा उलट, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराची मात्रा, रक्तपिपासू-निर्मम-शोषक ‘व्यवस्थे’करवी (Vampire-State System), त्याने केलेल्या ‘उघड्या’ हिंसाचाराचं छान निमित्त साधून (‘व्यवस्थे’करवी होणारी क्रूरता, ही अधिक घृणास्पद असली; तरी, ‘छुप्या’ स्वरुपातच रहाते), भयंकर क्रूरतेनं अजून वाढवली जाणारी असली, तरीही!

…म्हणूनच, हिंसाचाराच्या मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरुपी इलाज करणं, अत्यावश्यक ठरतं…लष्करी किंवा  पोलिसी कारवाईसारखा तात्पुरता व अंगलट येणारा, माणूसकीशून्य इलाज केव्हाही त्याज्यच ठरावा!

…मग, प्रश्न रशिया-युक्रेन युद्धाचा, गाझापट्टीतील नृशंस हिंसाचाराचा अथवा आपल्या देशातल्या नक्षलवादग्रस्त भागातील अशांततेचा-अस्वस्थतेचा असो वा असो शेतकरी किंवा महिला-पहेलवानांच्या आंदोलनांचा अथवा काॅर्पोरेट-क्षेत्रातील ‘कंपनी-दहशतवादा’चा (Corporate-Terrorism) व त्यातून उद्योग-सेवाक्षेत्रात फोफावलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’तील गुलामगिरी व नवअस्पृश्यतेच्या प्रतिकाराचा असो!

 आज विजयादशमी, दिवस ‘रावण-दहना’चा असला; तरीही, रावण फक्त, रामायणात नसतो किंवा दुष्ट दुर्योधन-दुःशासन फक्त, महाभारतात नसतात… तर, तशा अहंमन्य-अत्याचारी ‘प्रवृत्ती’, सदासर्वकाळ सर्वत्र मौजूद असतात… त्या कधि काॅर्पोरेटीय-क्षेत्रात ‘व्यवस्थापक’ म्हणून, कधि शासन-प्रशासनाच्या विविध खात्यात उच्चपदस्थ-उच्चशिक्षित अधिकारी म्हणून, तर कधि समाजातले लब्धप्रतिष्ठित या नात्याने मिरवणारे विविध ‘व्यावसायिक’ म्हणून भेटत रहातात आणि आजच्या संदर्भात बोलायचं, तर ‘गोदी-मिडीया’तून आपली इच्छा असो वा नसो, त्या ‘रावण-प्रवृत्ती’ जबरदस्तीने सतत आपल्या भेटीला येतच रहातात!

“ते ‘राममंदिर’ बांधतात…पण, राजरोस ‘रावणा’पेक्षाही भयंकर आचरण करतात…मुखात त्यांच्या ‘राम’ असतो; पण, अंतःकरणात ‘नथुराम’!”

…तेव्हा, वर्ष-२०२४च्या येत्या लोकसभा-निवडणुकीत, ‘काडेपेटी’तून नव्हे; तर, ‘मतपेटी’तून या सर्व सत्ताधुंद, अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’ केलं जाणं, त्यांच्या ढोंगी-बनावट ‘हिंदुत्वा’च्या ‘रामलीले’वर अखेरचा पडदा टाकणं, किती अगत्याचं आहे, हे दसरा-विजयादशमीच्या मुहूर्तावर, काही वेगळं सांगायला हवं…???

 …सर्वांना मनःपूत दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा व धन्यवाद!

 …राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)